तोतया फौजदारास अत्याचार प्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : २४ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार करणारा तोतया फौजदार अमित लालखान तडवी (२४, रा. गोंदेगाव ता. जामनेर जि. जळगाव ह.मु. छत्रपती संभाजीनगर) याला १० वर्षांची सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १५ हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी शुक्रवारी (दि.२७) ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी १० हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचेदेखील आदेशात नमूद करण्यात आले
आहे. फिर्यादी नुसार, सार, पीडिता ही आई आणि लहान भावासोबत राहते. फेब्रुवारी २०२३ पासून आरोपी अमित तडवी हा पीडितेच्या घरात किरायाने राहात होता. मे २०२३ मध्ये पीडितेच्या आईचा अपघात झाला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात यात आली होती. तेव्हापासून आरोपी अमित त्यांना मदत करीत होता. त्यामुळे त्याची पीडितेशी मैत्री झाली. तेव्हा त्याने पीडितेला पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून ओळख वाढविली होती. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. १९ सप्टेंबर २०२३ रोजी पीडिता घरात एकटी असल्याचे बघून आरोपीने बळजबरी तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पीडिता, तिचा लहान भाऊ व आरोपी आणि त्याचा मित्र २२ सप्टेंबरला २०२३ रोजी मुंबईला गेले होते. तेथे काही फोटो काढले होते. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पुन्हा पीडितेला ब्लॅकमेल करून अत्याचार केला. तोतयागिरी समोर आल्यावर १३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याला घरातून हाकलून दिले होते. त्यानंतरही त्याच्या मित्राने पीडितेला फोन करून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
११ साक्षीदार तपासले
८ तत्कालीन उपनिरीक्षक ई. एस. कामठे यानी दोषारोपपत्र दाखल केले, खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यानी ११ साक्षीदार तपासले. त्यात पीडितेची साक्ष महत्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून कलम ३७६ (२) (एन) मध्ये दहा वर्षे सक्तमजुरी, १० हजारांचा दंड, कलम ४१७ आणि कलम १७० अन्वये एक वर्षांचा कारावास, आणि प्रत्येकी २ हजारांचा दंड आणि कलम ५०६ अन्वये सहा महिन्याचा कारावास आणि १ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधीकारी म्हणून उपनिरीक्षक विजय साळवे आणि अभिमन्यू सानप यांनी काम पाहिले. अ‍ॅड. बागुल याना अ‍ॅड, मोनाली बागुल, अ‍ॅड. अक्षय तिळवे यांनी सहकार्य केले.